पुणे (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावीत, याबाबत नियमावली आहे. पोलीस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, मुंबईत असताना मला काही पोलीस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे समजले. त्याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समजले की उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या आहेत. परंतु गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात, याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने पूर्ण करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही पवार यावेळी म्हणाले.