कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही तासांपासून कोल्हापूर शहरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्यानिमित्ताने तणावाचं वातावरण असून, आज शहरात अनेक ठिकाणी जमावाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कोल्हापूरमधील अशांततेला कोण जबाबदार आहे ? असा सवाल करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात अशांतता निर्माण केली जात आहे, असा आरोप केला.
मिळालेल्या माहितीनुसार आज जमावाच्या तोडफोडमध्ये कोल्हापुरात ठिकठीकाणी मोठं नुकसान झालं असून, शहरात आज दिवसभर तणावाचं वातावरण आहे. यावरुन अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारलं असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवून आणण्याचा डाव आहे, हे तपासावे लागेल. शांतताप्रिय कोल्हापूर शहरात अशांतता निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत आहे, याचा छडा राज्य सरकारने लावावा, असेही अजित पवार म्हणाले.
आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडत आहेत का ?, कोल्हापूरातील घटनेमागे कोण याचा शोध घ्यावा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा, पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करु नका, महाराष्ट्रातील पोलीस हे समाजकंटकांवर धडक कारवाई करण्यास समर्थ आहेत, पोलिसांना कारवाईची मोकळीक देण्यात यावी, असेही ते म्हणाले.