कोल्हापूर (प्रतिनिधी) : एशियन टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाल्याबद्दल कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिचे आज (बुधवार) तिच्या घरी जाऊन कोल्हापूर दक्षिणचे आ. ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झालेली ऐश्वर्या ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली आहे. ऐश्वर्यासह जपान, कझाकिस्तान, कोरिया येथील चार खेळाडूंचा या संघात समावेश आहे.

यावेळी तिच्याकडून विम्बल्डन स्पर्धेसंदर्भात माहिती जाणून घेत तिच्या तयारी विषयी चौकशी केली. या स्पर्धेसाठी तिला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. मला खात्री आहे, या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या देदीप्यमान कामगिरी करेल. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानासुद्धा ऐश्वर्याचे आई-वडील तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहेत. त्यांचे हे पाठबळ नक्कीच कौतुकास्पद आहे, असे आ. ऋतुराज पाटील म्हणाले.