कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त चौसष्ठ एकर जमिनीची मोजणी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे भुमी अभिलेख कार्यालय आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत सुरू झाली. आज (गुरुवार) सकाळी  साडेअकराला सुरू झालेली मोजणी सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरु राहिली. तर शनिवार (दि. १२) अखेर ही मोजणी सुरू राहणार आहे.

मोजणीच्या ठिकाणी खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या मोजणीसाठी गडमुडशिंगी महसूल विभागातील पंधराशे  होऊन अधिक खातेदारांना नोटिसा काढण्यात आल्या होत्या. यापैकी बाराशेहून अधिक खातेदारांनी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. आपली मिळकत भूसंपादनमध्ये समाविष्ट होते की नाही याची शहानिशा खातेदार करत होते. परंतु आणखीन दोन दिवस मोजणी प्रक्रिया सुरू राहणार असल्यामुळे याबाबतचे अंतिम चित्र शनिवारनंतरच स्पष्ट होणार आहे. अत्याधुनिक डीजीपीएस आणि ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात येत आहे. मंडल अधिकारी अर्चना गुवळणी व तलाठी संतोष भिउंगडे यांनी सर्व खातेदारांना गर्दी टाळण्यासाठी आपल्या मिळकतीमध्ये थांबण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, मोजणीच्या ठिकाणी उपस्थित खातेदारांना आपल्या संपादित मिळकतींचा मोबदला कसा व किती मिळणार याबाबत संभ्रमावस्था होती. काही खातेदारांनी योग्य मोबदला न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त खातेदारांची कृती समिती स्थापन करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी भुमी अभिलेख करवीरचे उपअधीक्षक सुधाकर पाटील, भूकरमापक अमर सोळांकूरकर, सचिन जाधव, नितीन कुंभार, गणेश कांबळे, श्रीमती वंदना बेलकर, कोतवाल युवराज वड्ड, शिपाई शिवाजी कांबळे यांची उपस्थिती होती.