गोकुळ शिरगांव (प्रतिनिधी) : गोकूळ शिरगाव मॅन्युफक्चर असोसिएशन (गोशिमा) नेहमीच समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. गोकूळ शिरगाव येथील स्थलांतरित कामगारांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे एड्स प्रबोधनाचे कार्य आदर्श आहे. असे प्रतिपादन गोशिमाचे मानद सचिव मोहन पंडितराव यांनी केले.

करवीर तालुक्यातील गोकूळ शिरगाव येथील युवा ग्रामीण विकास संस्थेसाठी गोशिमा कार्यालयाकडून सामाजिक बांधिलकी उपक्रमातून मोफत डीप फ्रीज भेट देण्यात आला. अध्यक्षस्थानी गोकूळ शिरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच महादेव पाटील होते.

सरपंच महादेव पाटील म्हणाले की, युवा संस्थेने समाजासाठी समाजमन जपले आहे. या संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. कामगारांसाठी मोफत एचआयव्ही एड्स, गुप्तरोग, क्षयरोग जनजागृती करणा-या संस्थेच्या प्रकल्पाला नेहमीच सहकार्य असणार आहे.

यावेळी युवा संस्थेचे संचालक मिलिंद ताम्हणकर, गोशिमा व्यवस्थापक कृष्णात सावंत, प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, सौ. दीपाली सातपुते, कौस्तुभ भोसले, हेमंत सूर्यवंशी, पौर्णिमा गुरव, सूरज मांडे, ए.एस कांबळे, यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थितीत होते.