मनसेचे पन्हाळा पं.स.समोर शालेय गणवेशात बोंबमारो आंदोलन (व्हिडिओ)

0
364

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील करंजफेण पैकी चव्हाणवाडी केंद्र शाळेची इमारात धोकादायक बनली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन    तत्काळ नवीन वर्ग खोल्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी पंचायत समितीसमोर पन्हाळा तालुका मनसेच्या वतीने आज (गुरूवार)  शालेय गणवेशात बोंबमारो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, चव्हाणवाडी केंद्र शाळेची संपूर्ण इमारत धोकादायक बनली आहे. याबाबत दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्लेखन आदेश दिला आहे. या शाळेमध्ये १ ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. केंद्र शाळेअंतर्गत १२ जि.प. शाळा व २ माध्यमिक शाळा संलग्न आहेत. या शाळेची गुणवत्ता व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा परिसरात लौकिक आहे. परंतु सध्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुव्यवस्थित एकही खोली उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षकांना मैदानावर विद्यार्थ्यांना बसवून ज्ञानदानाचे काम करावे लागत आहे.

 

यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, लवकरात लवकर वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी जिल्हा परिषदकडून निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, शिंदे यांनी लेखी पत्र दिल्यानंतर  मनसे तालुका अध्यक्ष विशाल मोरे यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. यावेळी मनसेचे अमर बचाटे, नयन गायकवाड, लखन लादे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.