मुंबई (प्रतिनिधी) : मागील सुमारे दोन वर्षांपासून राज्यातील नागरिक कोरोनाशी झुंजत असताना आता सरकारसह सर्वांची झोप उडविणारे वृत्त आहे. राज्यात आता निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. यालाही वटवाघूळच कारणीभूत आहे. महाबळेश्वरमधील एका गुहेमध्ये निपाह हा व्हायरस सापडला आहे. जगातल्या सर्वांत धोकादायक व्हायरसमध्ये याचा समावेश असून यावर अद्याप औषध सापडलेले नाही.

पुण्यातल्या NIV या संस्थेने केलेल्या संशोधनातून हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. वटवाघूळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह व्हायरस सापडला आहे. महाबळेश्वरमधल्या एका गुहेतल्या वटवाघूळांमध्ये निपाह आढळला. हा जगातला खतरनाक व्हायरस समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या जगातल्या दहा धोकादायक व्हायरसमध्ये निपाहचा समावेश होतो. हा व्हायरस वटवाघूळांमध्ये आढळतो. यावर औषध किंवा लस नाही. चिंताजनक बाब म्हणजे निपाहचा मृत्यूदर ६५ ते १०० टक्के एवढा आहे.