मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात  कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर  सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर आजपासून (सोमवार)  काही दिवस बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलने, मोर्च काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मोठा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत,  अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी  नुकतीच शरद पवारांसोबत  एका लग्नाला हजेरी लावली होती. त्यामुळे पवारांचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.