नागपूर (प्रतिनिधी) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केल्यानंतर  आता  कर्णकर्कश्य हॉर्न्सबाबत  लवकरच  मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी  यांनी दिली. गाड्यांच्या हॉर्नमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम  तयार केले जाणार आहेत. हे नियम थेट वाहननिर्मात्या कंपन्यांसाठी असतील, असेही गडकरी यांनी सांगितले.

गडकरी यांनी सांगितले की, मी नागपूरमधील माझ्या ११ व्या मजल्यावरील घरी रोज सकाळी मी एक तास प्राणायाम करतो. यावेळी गाड्यांच्या हॉर्नमुळे शांतता भंग होते. या त्रासाबाबत विचार केला असता गाड्यांचे हॉर्न हे ऐकण्यासाठी योग्य पद्धतीचे असले पाहिजेत असा विचार मनात आला. आता गाड्यांच्या हॉर्नचे आवाज हे भारतीय वाद्यांचे असावेत असा विचार आम्ही सुरु केला असून त्यासंदर्भात काम सुरु  केले आहे.

हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार आहे. याबद्दल लवकरच नवीन नियम तयार करून कायदा लागू केला जाणार आहे. यापैकी काही नियम हे थेट वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागू केले जाणार आहेत, असे गडकरी म्हणाले.