नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (शनिवार) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीत उभय नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अद्याप काहीही समोर आले नाही. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असून ते १९ दिवस चालणार आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी मोदी यांची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसापासून आगामी राष्ट्रपती म्हणून शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. भाजपविरोधी पक्षाकडून शरद पवारांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पवारांनी यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, तरीदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.