मुंबई (प्रतिनिधी) : दिग्दर्शक  नागराज मंजुळे यांच्या सैराट  चित्रपटाने चांगलाच गल्ला मिळवून दिला होता. मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला. फॅंड्री,  नाळ,  सैराट असे चित्रपट  केल्यानंतर आता नागराज मंजुळे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सैराटमधील परश्याला म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. आता पुन्हा एकदा नागराज आकाश ही लोकप्रिय जोडी भेटीला येत आहे.      

नागराज मंजुळे यांनी आपल्या ‘घर बंदूक बिरयानी’  या आगामी चित्रपटाचा ट्रिझर नुकताच प्रदर्शित केला आहे. यात नागराज मंजुळे,  आकाश ठोसर,  सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका आहे. झी स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आकाश ठोसरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घर बंदूक बिरयानी चांगभल म्हणत पोस्टर टाकलं आहे. सिनेमाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी लिहीली आहे. चित्रपटाला संगीतसाज ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चढवला आहे. पुढल्या वर्षी  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नागराज मंजुळे यांचे सलग तीन चित्रपट  लोकप्रिय ठरले आहेत. सैराटने बाजी मारत लोकप्रियतेच्या सर्व रेषा ओलंडल्या. आता या चित्रपटाकडे सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.