मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई केली. दरम्यान, आता ठाण्यातील एका राजकीय नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या नेत्याचे आणि सचिन वाझे यांचे आर्थिक संबंध असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणातून आणखी नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्याचबरोबर सचिन वाझेंनंतर मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाण्यातून आणखी काही जणांना लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यामुळे काहीतरी सबळ पुरावे हाती लागल्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात सचिन वाझे आणि एका राजकीय नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता.