मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व  होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर  दरमहा १०० कोटी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या आरोपावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली  आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी,  गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर शनिवारी सिंग यांनी हे पत्र दिल्याने माझा संशय बळावला आहे. परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न असून हे भाजपचे कटकारस्थान आहे. ही ‘सोची समझी चाल’ आहे. चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये.  सत्ता गेल्यापासून भाजप अस्वस्थ आहे. 

परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाण प्रयत्न आहे. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळा प्रकरणात भाजप त्यांच्यावर नाराज होता. त्यानंतर आता सचिन वाझे प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठीच हे कारस्थान सुरु असल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे.