कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील इथेनॉल कारखाना परिसर, गलगले मळा तसेच घोसरवाड हद्दीत असणाऱ्या शेतात काल (मंगळवार) रात्रीच्या सुमारास काही शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे आता हेरवाडमध्ये गव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या गव्याला वनविभागाने जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूरसह पेठवडगांव परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गव्याचे दर्शन झाले आहे. हेरवाड येथील श्री संतुबाई मंदिर परिसरात असणार्‍या इथेनॉल कारखान्यालगत काही शेतकर्‍यांना गवा दिसला होता. तर पाचवा मैल मार्गालगत असलेल्या गलगले मळ्यानजीकही काही शेतकऱ्यांना गवा दिसून आल्याची चर्चा सुरु आहे. तर घोसरवाड हद्दीतील शेतकर्‍यांना गवा दिसल्याची चर्चा आज (बुधवार) दिवसभर सुरु होती. त्यामुळे हेरवाडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरोळ पं.स. सदस्या मिनाज जमादार यांनी वन विभाग व तहसील कार्यालयाला याबाबतची माहिती कळविली असून या परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.