मुंबई (प्रतिनिधी) : आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला. त्याअंतर्गत ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन या लसीकरणासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत माहिती दिली आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात मोदी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी जलगतीने काम केले आहे. ते कौतुकास्पद आहे. जे लोक लसीकरणासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी.

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दुपारी तीनच्या सुमारास पवारांनी कोरोनाची लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करणारा व्हिडिओ पवार यांनी पोस्ट केला आहे.