सांगली  (प्रतिनिधी) : कामेरी (जि.सांगली) दौऱ्यावर असताना आमदार चंद्रकांत पाटील यांना गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला. फोनवरील त्या दोघांमधील संवाद संपताच चंद्रकांत पाटील यांनी गुड न्यूज असे शब्द उच्चारले. पण ही गुड न्यूज नेमकी कोणती ते त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे ती गुड न्यूज कोणती आहे, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार पाटील सांगलीतील ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या निवास्थानी आले होते. पाटील यांच्या निवास्थानी इतर नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते. त्यावेळी पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू असतानाच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. गृहमंत्री शहा यांचा फोन असल्याने ते संवाद थांबवून थोडे बाजूला गेले. दोघांचा फोन सुरू असताना तेथे कुजबूज सुरू झाली. पाटील यांनी शहा यांच्याबरोबरचा संवाद संपवून फोन बंद केला आणि सी. बी. पाटील यांच्याकडे पाहात गुड न्यूज असे म्हटले. फोनवरून अमित शहा यांनी बधाई हो असे म्हटल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. परंतु, अमित शहा फोनवर नक्की काय म्हणाले हे सांगितले नाही. त्यामुळे शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना नक्की कोणती गुड न्यूज हे सांगितले नाही. त्या दोघांमध्ये नक्की कोणता संवाद झाला आणि शहा यांनी कोणती गुड न्यूज दिली हे गुलदस्त्यातच राहिले.