टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील गट क्रमांक १२७४/१ यातील सुमारे १५ हेक्टर ४१ आर. गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण कायदेशीर पूर्तता करून काढण्याचे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या उपस्थितीत सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी डी.आर. देवकाते यांनी दिले. त्यानंतर तीन तरूणांनी आमरण उपोषण मागे घेत असल्याचे आज (बुधवार) येथे घोषित केले.  

अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपासून अक्षय पाटील, अनिकेत गुरव, विकास पाटील या तरूणांनी आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत आज आ.राजूबाबा आवळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी पोवार यांनी गावात येऊन तरूणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबत लेखी आश्वासन दिले. यात शासन नियमानुसार अतिक्रमण नियामानुकुल करणे, त्यासंदर्भात ग्रा.पं.ने असेसमेंटला नोंदी घेतलेली आहेत. त्या व्यतिरिक्त जादा असणारी मिळकत काढून टाकणे. बाहेर गावी असणाऱ्या अतिक्रमणधारकांची घरे काढून टाकणे. गावात घर असताना गायरानमध्ये अतिक्रमण केले असेल, तर असे अतिक्रमण काढून टाकणे आणि त्याचबरोबर जे बेघर आहेत, त्यांना अतिक्रमणमध्ये ५०० स्के.फूटपर्यंत जागा देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर या तरुणांनी आमरण उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, नंदकुमार मिरजकर, भगवान पाटील, दिलीप पाटील, मुकुंद पाटील, नागेश पाटील, अमोल पाटील, दीपक पाटील, संजय कोळी, सागर पाटील, संजय शेटे, अमित पाटील, नवनाथ स्वामी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.