सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हऴदीमध्ये भरला आठवडी बाजार

0
322

कोथळी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कोल्हापूर – राधानगरी मार्गावरील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या हऴदी येथील आठवडी बाजार कोरोनामुळे ७ महिने बंद होता. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्यामुळे तसेच जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी झाल्यामुळे हा आठवडी बाजार तब्बल महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठे व्यापारी तसेच नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली बाजारपेठ सुरू झाल्याने पहिल्या दिवशी ग्राहकांची वर्दळ वाढली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व आठवडे बाजार बंद केले होते. आता काही नियम शिथिल करून आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक दिवसांनंतर प्रथमच आज (शनिवारी) हऴदीचा आठवडी बाजार भरला. यावेळी किरकोळ विक्रेत्यांसह ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. बाजार सुरू झाल्याने ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते, किरकोळ विक्रेते, किराणा व्यावसायिक आदी दुकानांची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने विक्रेते आणि ग्राहक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळाले.