कोल्हापूर (प्रतिनिधी) : दैनंदिन सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष करीत जबाबदारी पार पाडण्यात कुचराई केल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आरोग्य निरीक्षकांना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दंड ठोठावला आहे.

शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा उठाव, डर्टी स्पॉटचे सौंदर्यीकरण, नाला/चॅनेल सफाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ती जबाबदारी त्यांनी दैनंदिन पार पाडण्याची आहे; परंतु प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना फिरतीच्या वेळी ए-३ चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व ई-३ चे आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांच्या भागामध्ये दैनंदिन स्वच्छता व कचरा उठाव होत नसल्याचे निदर्शनास आले.

या आरोग्य विभागाकडील दोन आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या जबाबदारीनुसार दैनंदिन काम केले नसल्याने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी करण लाटवडे यांना दि.१० नोव्हेंबर रोजी व राजेंद्र पाटील यांना दि.१८ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांच्याकडे खुलासा मागणी केला होता. या दोघांचा खुलासा आल्यानंतर तो प्रशासकांनी अमान्य करुन त्यांना दंड ठोठावला आहे. यामध्ये आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांना २ हजार रुपयांचा, तर आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांना एक ह्जार रुपयांचा दंड करण्यात आला. हा दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्यात येत आहे.