मुंबई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता  या घटनेतील पीडितेला दोषी ठरवत गावाबाहेर काढण्याचा ठराव करणाऱ्या तीन ग्रामपंचायतीवर प्रशासक आणून ग्रामपंचायती बरखास्त करण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव, वसंतनगर तांडा आणि जयराम नाईक तांडा या तीन गावांमधील पंचायतीने ठराव करून पीडितेवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला होता. याबाबत गोऱ्हे यांनी गृहमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांना पत्र देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे व मनिषा तोकले, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांनी या प्रकऱणात लक्ष घातल्याने पीडितेला न्याय मिळाला आहे.