शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी या गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या योजनेचे काम अर्ध्यावरच रखडले होते. या सुधारित योजनेच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली असून सुमारे ३ कोटी २ लाखांच्या या योजनेची निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट केले.

ना. यड्रावकर म्हणाले की, काही वर्षांपासून शिवनाकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अर्ध्यावरच रखडले होते. ठेकेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविली होती. योजना रखडल्यामुळे खर्चात वाढ झाली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा विभागाकडून या योजनेचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. याकामी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे सुधारित योजनेस मान्यता द्यावी अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार नियोजन व वित्त विभागाने या योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता दिली असल्याने शिवनाकवाडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.