कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी. यासाठी अभियंते व बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना  पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या. ते अभियंते व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांची निर्गती तातडीने झाल्यास शहर व जिल्ह्यातील विकास कामे गतीने होतील. नगररचना, महसूल, जिल्हा भूमि अभिलेख आणि प्राधिकरणाने याबाबत समन्वय राखून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. महानगरपालिका आणि प्राधिकरणासाठी अभियंत्यांनी एका शाखा कार्यालयात परवाने काढले तरी इतर शाखा कार्यालात ते ग्राहय धरले जावेत. त्याचबरोबर युएलसीकडून ना-हरकत आवश्यक असलेल्या जागांची यादी जाहीर करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, अभियंते व बांधकाम व्यावसायिकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी प्राधान्य दिले जाईल. बांधकाम व्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, याबाबत आवश्यक उपाययोजना केल्या जातील.

या बैठकीला पालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी सुदाम जाधव, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, उपअभियंता रमेश मस्कर, नगर भूमापन अधिकारी किरण माने, संजय चव्हाण, प्रसाद गायकवाड, असोसिएशनचे अजय कोराणे, विजय चोपदार, पदाधिकारी उपस्थित होते.