कोल्हापूर (प्रतिनिधी) : ब्रह्मेश्वर बाग परिसरातील एका जुन्या ले आउटमधील रस्ता बिल्डरने पत्र्याचे कपांऊड बांधून गडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही नगररचना विभाग व विभागीय कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे बिल्डरच्या जागा घशात घालण्याच्या प्रयत्नाला प्रशासनाचा हातभार आहे, असा आरोप अजित ठाणेकर यांनी केला आहे.

ठाणेकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, शिवाजी पेठेमध्ये ब्रह्मेश्वर बाग परिसरात पूर्वी नारळाची बाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोठ्या जागेवर शहराच्या दुसर्‍या सुधारीत विकास आराखड्यात वाणिज्य क्षेत्राचे आरक्षण ठेवले गेले होते. परंतु कालांतराने या आरक्षणात बदल होत होत तेथे अनेक अपार्टमेंटस् उभी राहिली. ही अपार्टमेंटस् बांधण्यासाठी जो ले आऊट तयार करण्यात आला त्यामध्ये १२ मीटरचा एक रस्ताही प्रस्तावित करण्यात आला. सध्या या रस्त्याचा बहुतांश भाग अतिक्रमणांनी व्यापला आहे. त्यातच एका बिल्डरने या रस्त्याच्या जागेत सुमारे १०० फूट लांब आणि २० फूट रूंद असे पत्र्याचे कंपाऊंड उभारले आहे. त्या जागेतून त्याने अपार्टमेंटची ड्रेनेज लाईनही टाकली आहे. या जागेवर मालकी आहे असे सांगत हा बिल्डर पलिकडच्या जागेत महानगरपालिकेच्या कामांनाही अडथळा करू लागला आहे. याबाबत गेल्या आठवड्यात वारंवार तक्रार करूनही नगररचना विभाग व विगाभीय कार्यालयाने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. बिल्डरला लाभ मिळावा म्हणून प्रशासनाचाच हा डाव आहे की काय असा प्रश्न पडतो आहे. हे अतिक्रमण ताबडतोब काढले नाही तर नागरिकांच्या सहाय्याने हे अतिक्रमण स्वत: काढून टाकू असा इशाराही देण्यात आला आहे.