मुंबई (प्रतिनिधी) : आज होणारी मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आधी आमदार नेले, मग उद्योग नेले आणि मंत्रिमंडळ घेऊन गेले आहेत, असा उपरोधिक टोला आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना लगावला.

राज्यात ओला दुष्काळ आहे. बेरोजगारी वाढत आहे, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा आहे, असे असताना मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. आपले मंत्रिमंडळ गुजरातमध्ये व्यस्त आहे. राज्यातील प्रश्नांबाबत मंत्रिमंडळ बैठक गरजेची आहे. ओला दुष्काळाचे निकष बदलण्यासाठी समितीची गरज असते; पण राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राज्यातील प्रश्नांसाठी एक तासही नाही. आपले राज्य सोडून इतर ते राज्यात व्यस्त आहेत. मंत्री प्रचारासाठी गुजरातला गेलेत याचे दुःख नाही. महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक व्हायला हवी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. ‘मी बिहार दौऱ्यावर पाटणा येथे जाणार आहे. तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. पर्यावरणासह इतर विषयांवर चर्चा होऊ शकेल,’ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.