मुंबई (प्रतिनिधी) : ती संघटना आहे की पक्ष आहे, मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, अशा शब्दांत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला लक्ष्य केले आहे. बाळासाहेबांचे फोटो लावून शिवसेनेकडून खंडणी घेतली जात आहे, असा खळबळजनक आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर केला होता. यावर आदित्य ठाकरे यांनी खरमरीत शैलीत मनसेला फटकारले आहे.

फेरीवाले बाळासाहेबांचे फोटो लावून खंडणी घेतात. बाळासाहेबांचे फोटो लावून हे कृत्य करणे दुर्दैवी आहे. ही तर वीरप्पन टोळी आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून संताप व्यक्त होत आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (गुरुवार) मुंबईतील चेंबूर येथील भक्ती पार्कमध्ये मियावाकी बागेची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी मनसेची चांगलीच खिल्ली उडवली. मनसेची त्यांनी ‘ही तर टाईमपास टोळी आहे’ अशी संभावना केली.

त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजपलाही चिमटा काढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला दिलेला सल्ला केंद्राला द्यावा, असे म्हटले आहे. जगभरातून किंवा आपल्या देशातून कोणीही ट्विट केले तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत का बोलत नाहीत?, असे यावेळी ते म्हणाले.