मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत जवळपास ४० हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे आपण शिवसेनेत असल्याचे सांगत असताना शिंदे उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर नाराज आहेत. आपण कोणताची निर्णय घेतला नव्हता तरी आपल्याला गटनेते पदावरुन हटवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री व उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांचा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रवेश देण्यात आला नव्हता.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना पवईतील हॉटेल रेनिसन्समध्ये ठेवण्यात आले होते. तिथे आमदारांनी मतदानाविषयी माहिती देत असतानाच एकनाथ शिंदे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद झाले होते, असे सांगण्यात येत आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी शिवसेनेने आमदारांना मतदानाच्या कोट्याबाबत माहिती देण्यात येत होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला अतिरिक्त मते देण्याला विरोध केला होता. त्यावरुनच हा वाद झाला असे सूत्रांनी म्हटले आहे. काँग्रेसने विधानपरिषदेसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उभे केले होते; मात्र भाई जगताप हे विजयी झाले असून, चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीच्या दोन दिवसांआधी रेनिसन्स हॉटेलमध्ये विधानपरिषद निवडणुकीत मतांचा कोटा ठरवून देण्यात आला होता. मतदान कसे होईल यावर चर्चा सुरू होती. दरम्यान, याचवेळी शिंदे यांचे राऊत आणि आदित्य यांच्यासोबत मतभेद झाले. सेनेच्या आमदारांच्या मतांचा वापर करून काँग्रेसच्या उमेदवारांना आमदार म्हणून निवडून आणण्याची कल्पना शिंदे यांना पटली नाही. त्यामुळं दोन्ही बाजूंमध्ये वादाची ठिणगी पडली. विधानपरिषद निवडणुकीच्या आधी घडलेला या प्रसंगामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.