मुंबई (प्रतिनिधी) : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भाजपनेही जोरदार तयारी चालवली आहे. विधान भवनातील व्यवस्थेसंदर्भात भाजपचे प्रवीण दरेकर व सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व विधान भवन सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रवीण दरेकर आणि मी स्वत: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेऊन उद्याच्या आसन व्यवस्थेसंदर्भात व जे काही आमदार आजारी आहेत, त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेबाबत चर्चा केली. विश्वासदर्शक ठरावासाठी येथील सुरक्षा व्यवस्था चोख असावी, अशी मागणी केली.

ते पुढे म्हणाले की, वर्तमानपत्रातून व चॅनलच्या माध्यमातून काही लोक जे धमक्या देत आहेत, त्यावरून या लोकशाहीच्या मंदिरात कोणत्याही पद्धतीचा हल्ला कुणी करण्याचा प्रयत्न करू नये, ही बाब आम्ही विधानसभा उपाध्यक्ष व सचिवांच्या दृष्टीस आणून दिली. सुरक्षेची जबाबदारी पोलीस, प्रशासनाची आहे, भाजपची नाही. येथे कोणीही गुंडगिरी करू नये, यावर पोलिस विभागाचे अधिकारी योग्य ती कृती करतील, असा विश्वास आहे.

मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी व आमदारांनी स्वत: मविआ सरकारमधील फुटीचे भाष्य केले आहे. मग माध्यमातून यांनी भाजपवर व राज्यपालांवर टीका करणे चुकीचे आहे. हे केजी वनचे विद्यार्थी आहेत का? सुपीक डोक्यातून नापीक कल्पना करणे बंद केले पाहिजे. आसनव्यवस्थेबाबत आम्ही भाजपच्या बाबतीत बोललो, एकनाथ शिंदे त्यांच्या आसनव्यवस्थेबाबत बोलतील. तो आमचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने या आमदारांना संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत, जर कुणी त्यांच्यावर हल्ला केला, तर हा न्यायालचा अवमान ठरेल. विरोधक राज्यपाल दबावात काम करत असल्याचा आरोप करत असल्याच्या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, त्यांच्याकडे जर संख्याबळ असेल, तर त्यांनी ते लगेच सिद्ध करावे. संविधानात म्हटले आहे की, अस्थिर सरकार नको आहे. ही लोकशाही एका माणसाने मुख्यमंत्री व्हावे आणि हजारोंनी खितपत पडावे, यासाठी नाही. भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. जशी प्रश्नपत्रिका येईल तशी ती सोडवू.