मुंबई (प्रतिनिधी) : उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनविल्याबद्दल मुंबई क्राईम ब्रँचने सोमवारी रात्री अटक केली. फेब्रुवारीमध्ये क्राईम ब्रँचनं अश्लील चित्रपट बनवणा-यांवर तसंच विशिष्ट ऍप्लिकेशनवर ते अपलोड करणा-यांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हा प्रमुख आरोपी असल्याची बाब तपासात समोर आली. आज सकाळी त्याला किला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

व्हिडिओ अपलोड करणार्‍या उमेश कामथलाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. मुंबई पोलिसांनीही २६ मार्च रोजी याच प्रकरणात एकता कपूर हिचा जबाब नोंदवला होता. महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचेही जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा असे सांगते की, राज कुंद्रा यानेच तिला पॉर्न फिल्म उद्योगात आणले. मला प्रत्येक प्रकल्पासाठी ३० लाख रुपये दिले जायचे. मी आतापर्यंत १५ ते २० प्रकल्प केले आहेत.

अश्लील चित्रपट देशातून नव्हे तर परदेशातून अपलोड केले गेले होते. उमेश कामत याने अॅप्लिकेशन बेस वेबसाइटवर नवीन अभिनेते आणि अभिनेत्रींवर चित्रित केलेले व्हिडिओदेखील अपलोड केले होते. आतापर्यंत ९०  पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ शूट केले गेले आहेत आणि ते अपलोड केले गेले आहेत. पोर्नोग्राफीचा हा संपूर्ण खेळ पहिल्यांदा चर्चेत आला जेव्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली. वसिष्ठ हिच्या अटकेनंतर हळूहळू या प्रकरणातील प्रकार उलगडण्यास सुरुवात झाली.

पोर्नोग्राफिक चित्रांचे शूटिंग सुरू असलेल्या मुंबईतील मालाड पश्चिम येथे मढगांव येथे एक बंगला भाड्याने घेण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी येथे छापा टाकला त्यावेळीही अश्लील चित्रपटांचे शूटिंग सुरू होते. हे अश्लील चित्रपट आणि व्हिडिओ बर्‍याच साइटवर अपलोड केले गेले. यातून कुंद्रा याने अमाप पैसा कमावला. काल गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला चौकशीसाठी बोलावले होते. कुंद्रा हा रात्री ९ वाजता मुंबई गुन्हे शाखेच्या भायखळा कार्यालयात पोहोचला. सुमारे २ तास चौकशी केल्यानंतर रात्री अकरा वाजता त्याला अटक करण्यात आली