मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी सिनेसृष्टीतील ‘बंधन’, ‘जुडवा आणि ‘क्रोध’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांची अभिनेत्री रंभाच्या गाडीला कॅनडात अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंभा मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना ही घटना घडली. यामध्ये रंभाची धाकटी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेची माहिती, अभिनेत्री रंभाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यावेळी अभिनेत्री रंभाने सांगितले की, मुलांना शाळेतून घरी घेऊन जाताना चौरस्त्यावर आमच्या कारला दुसऱ्या कारने धडक दिली. मी आणि माझी आया मुलांसोबत गाडीत होतो. आम्ही सर्व सुखरूप आहोत, आम्हाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. परंतु, माझी छोटी मुलगी साशा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. हे खूप महत्त्वाचं असल्याचे सांगत रंभाने तिच्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्टसोबत शेअर केला आहे.