कोल्हापूर (प्रतिनिधी) : चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे यांची प्रमुख भूमिका असणारे रोमँटिक विनोदी नाटक ‘इशारो इशारो में’ कोल्हापुरात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २ एप्रिल रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग सादर होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

यावेळी अबोल मनाचा बोलका अविष्कार असणाऱ्या विनोदी, रोमान्स आणि रसिकांच्या भावनेला हात घालणाऱ्या या नाटकाचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सागर कारंडे यांनी आज (बुधवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केले आहे.

सरगम क्रिएशन निर्मित सई इंटरटेनमेंट प्रस्तुत इशारो इशारो में या नाटकाची मूळ संकल्पना आणि दिग्दर्शन जय कापडीया यांचे आहे. केले आहे. तर मूळ लेखक प्रयाग दवे असून याचा अनुवाद मराठीमध्ये स्वप्नील जाधव यांनी केला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांनी या नाटकाला संगीतबद्ध केले आहे. या नाटकात सागर कारंडे यांच्या सोबत उमेश जगताप, संजना हिंदुपूर, शशिकांत गंगावी, अव्यान मेहता यांच्याही भूमिका आहेत. अल्पावधीतच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून आज अखेर एकूण ३५ प्रयोग झाले आहेत. दरम्यान, आता हे नाटक पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.

यावेळी नाटकाचे निर्माते अजय कासुर्डे, गिरीश महाजन, प्रविण भोसले उपस्थित होते.