डेटा चोरीप्रकरणी अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या मुलासह १० जणांना अटक

0
30

पुणे (प्रतिनिधी) : बॅंकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रख्यात अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन याच्यासह १० जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.  पुणे पोलिसांच्या सायबर सेलने केलेल्या या कारवाईमुळे या डेटा चोरी व विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये वाचले आहेत. विशेष म्हणजे रोहन मंकणी हा भाजप चित्रपट आघाडीचा अध्यक्ष आहे.

 काही बँकांच्या देशभरातील खातेदारांची निष्क्रिय खात्यांची गोपनीय माहिती चोरुन, या माहितीची विक्री करण्याचा या संशयितांचा डाव होता. डेटा खरेदीवेळी २५ लाख रुपये घेताना रोहनसह १० जणांना अटक करण्यात आली. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे.  या डेटा चोरी व विक्री करण्याच्या प्रयत्नातून खातेदारांच्या खात्यातून जाणारे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये पोलिसांमुळे वाचले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी चौघेजण नामांकीत कंपन्यांमध्ये संगणक अभियंता आहेत.