मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता फराज खान याचे वयाच्या ४६व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर बंगळूरु येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनावर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

फराजला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाला होता. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अभिनेता सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली होती.

१९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.   त्याने ‘पृथ्वी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ या चित्रपटांमध्ये काम केले. ‘मेहंदी’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत काम केले. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये त्याने अभिनय केला आहे.