मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता आणि एल्डर या औषध निर्मिती कंपनीचा सीओओ अनुज सक्सेनाला गुंतवणूकदाराचे १४१ कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक विभागाने (ईओडब्ल्यू) अटक केली. कंपनीच्या एका गुंतवणूकदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

२०१२ सालात अनुजने गुंतवणुकीचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते न मिळाल्याने त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुसुम’ या लोकप्रिय मालिकेत अनुज मुख्य भूमिका साकारत आहे.

दरम्यान, ईओडब्ल्यूने अनुजची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अनुजने या याचिकेचा विरोध केला आहे. मी एक मेडिकल प्रॅक्टिशनर असून सध्या त्याच्या कंपनीत पीपीई किट आणि सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. सध्याच्या महामारीच्या काळात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने ही चौकशी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांने केली आहे.