कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील जे नागरीक जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात ते  पाळलेली जनावरे उघडयावर सोडत असलेचे निदर्शनास येत आहे. यामुळे रत्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. जर एखाद्या नागरीकाला अशी जनावरे रस्त्यावर सोडलेचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

महापालिकेच्यावतीने वारंवार आवाहन करुनही काही खाजगी मालक त्यांची जनावरे चरण्यासाठी रस्यावर सोडत असलेचे आढळले आहे. ही जनावरे पुन्हा रस्त्यावर सोडल्यास जनावरे पकडून संबंधीत मालकावर रितसर कार्यवाही करण्यात येणार आहे. या जनावरांच्या शिंगामुळे नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. जनावरांना खाद्यामधील फरक कळत नसल्यामुळे ते प्लॅस्टिक, कापड आणि इतर अपायकारक पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांची दूध आणि इतर उत्पादकता कमी होते.

यामुळे नागरीकांनी जनावरे रस्त्यावर खाद्यासाठी न सोडता त्यांना गोठयातच पोषक आहार देणे आवश्यक आहे. सध्या पांजरपोळ या ठिकाणी अशा जनावरांना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही जनावरे महापालिकेच्या हद्दीबाहेर पाणी, चारा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत.

जर एखाद्या नागरीकाला अशी जनावरे रस्त्यावर सोडलेचे निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरीत महापालिकेच्या आरोग्य पथकाशी (९७६६५३२०५१, ९५६१८१४४७४) या नंबरवर संपर्क साधावा. तसेच या जनावरांचे मालकाचे नावही या नंबरवर कळविल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करता येईल. तरी रस्त्यावर जनावरे सोडल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.