नागपूर (वृत्तसंस्था) : ‘पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, त्याला शोधून त्यावर कारवाई करू’ अशा शब्दांत फडणवीसांनी इशारा दिला आहे. काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. शुक्रवारी पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणावर पोलिसांनी मौन धारण केले आहे. घोषणाबाजी केलेल्या प्रकारावर पोलिसांनी अजून स्पष्टीकरण दिले नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, भाजपचे आमदार राम सातपुते यांनी हा व्हिडीओ ट्वीट केलाय.