शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलविरोधात कारवाई करावी : प्रहार जनशक्तीची मागणी

0
747

टोप (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराने गेली वर्षभर राज्यासह देशातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा कणा मोडला आहे. असे असताना ऑनलाईन क्लासच्या नावाखाली हजारो रुपये भरमसाठ फी वसुली करण्याचे काम शिरोलीतील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलकडून होत आहे. त्यामुळे या संस्थेविरुद्ध कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत २०२०-२१ वर्षासाठी शैक्षणिक संस्थांनी फी वसुलीसाठी सक्ती करू नये, सवलत द्यावी, अशा सूचना राज्य शासनाकडून वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील शिरोली येथील इंग्लिश माध्यम सीबीएसई पॅटर्न पद्धतीचे सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमधून विद्यार्थ्यांसह पालकांवर फी वसुलीसाठी अनेक प्रकारे दबाव आणला आहे. शासन आदेश धाब्यावर बसवून पालकांकडून वारेमाप फी वसूल केली जात आहे. यामध्ये सुरक्षारक्षक फी, पेन्सिल, नोटबुक झेरॉक्स, आदर ऍक्टिव्हिटीज, युनिफॉर्म या कारणांनी पैसे वसूल करण्यात आलेले आहे. फी भरलेल्या पावतीमध्ये अनेक त्रुटी असून यात शाळेचे नाव, शिक्का असलेल्या पावत्या शाळेतच ठेवून त्यावर तारीख सुद्धा नसलेचे निदर्शनास आले आहे. ज्या पालकांना फीची वेळेत पूर्तता करता आलेली नाहीये, त्यांच्या मुलांना ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये बसू न देणे किंवा शाळेतून दाखला काढून घेऊन जा अशा पद्धतीच्या धमक्याही मुख्याध्यापक यांच्याकडून फोनद्वारे व एसएमएसद्वारे देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आपण यामध्ये हे लक्ष घालून या संस्थेवर ठोस कारवाई करावी, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाला मोठे जन आंदोलन उभारावे लागेल. यातून होणाऱ्या सर्व नुकसानीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, अनिस मुजावर, हातकणंगले युवक तालुकाध्यक्ष वैभव जामदार, सचिव अक्षय जाधव, समीर येवलुजे, सचिन कुरले, माधुरी म्हेत्रे, नीरज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापनाचा खुलासा – :

सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुमारे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत असून आजपर्यंत एकाही पालकांची तक्रार संस्था किंवा शाळेकडे आलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू होते. शिक्षण विभागाच्या आदेशाने आता शाळा सुरू केली आहे. शिरोली परिसरातील ही एकमेव सीबीएसई पॅटर्न शाळा असून, काही विघ्नसंतोषी मंडळी शाळेची बदनामी करण्यासाठी असे कटकारस्थान करीत आहेत. ज्या विद्यार्थी किंवा पालकांची कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी शाळेशी संपर्क साधावा. शाळा व्यवस्थापन व संस्था त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे.

– गणपतराव पाटील (संस्थाध्यक्ष)