आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी कृती आराखडा  

0
241

गारगोटी (प्रतिनिधी) : येत्या वर्षभरात अंजिवडे – पाटगांव  या कमी अंतराच्या घाट रस्त्याचे काम वेगाने आणि  नियोजनबध्द करण्यासाठी कुडाळ,  सावंतवाडी,  वेंगुर्ले व भुदरगड या ४ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या काल झालेल्या बैठकीत कृती आराखडा तयार करण्यात आला. वेळ पडल्यास ३ किलोमीटरचा रस्ता श्रमदानातून करू, पण आंजिवडे – पाटगाव रस्ता कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.  तसेच  तीन समित्यांची स्थापना करण्यात आली.  माणगाव (ता. कुडाळ) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. किशोर शिरोडकर होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या इतर सर्व घाटरस्त्यापेक्षा हा मार्ग अत्यंत सहज सोपा, सुलभ  होणार आहे. कोल्हापूर, कुडाळ, सावंतवाडी,  वेंगुर्ले व गोवा अंतर येताजाता सुमारे ७० किलोमीटरने कमी होणार  आहे. या मार्गामुळे ५० हून अधिक पर्यटनस्थळे व अनेक अविकसित गावे जोडली जाणार आहेत.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमित सामंत म्हणाले की,  या घाट रस्त्यासाठी आवश्यक रक्कम ३२ कोटी फार मोठी तरतूद नाही.  याबाबत  उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्याकडे  सर्व लोकप्रतिनिधींची बैठक लावून तोडगा काढूया.

वेंगुर्ल़्याचे माजी नगराध्यक्ष सुनिल डुबेळे म्हणाले की,  आपण आपली कामे वाटून घेवून समिती देईल, ती जबाबदारी स्वीकारूया. सर्वपक्षीय एकत्र येऊन भागाच्या विकासाचा हा रस्ता प्रकल्प आता पूर्ण करूया.

ज्येष्ठ मार्गदर्शक बाळा सावंत म्हणाले की, या घाट रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबी तत्काळ पूर्ण करू.  हा घाट रस्ता झाल़्यास ४ तालुक्याचा विकास वेगाने होईल.  येत्या ३० सप्टेंबरच्या आत याचा निकाल लावूया.

भुदरगड तालुक्यातील शेणगावचे  काँग्रेसचे सरपंच सुरेशराव नाईक म्हणाले की, या रस्त्यासाठी  कोल्हापूरचे पालकमंत्री  सतेज पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा व सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त उपअभियंता आर. के. देसाई यांनी या घाट रस्त्यासाठीची तांत्रिक माहिती दिली. व हा घाटरस्ता किती महत्वाचा आहे, हे विषद केले.

यावेळी जि. प. सदस्य राजू कविटकर,  सदस्या वर्षा कुडाळकर,  पं. स. सदस्या श्रेया परब,  माजी सभापती मोहन सावंत,  माजी जि. प.  सदस्य आनंद मिस्त्री,  माजी जि.  प. सदस्य एस. एम. पाटील,  प्रा. आनंद चव्हाण,  पत्रकार सुभाष माने  माणगाव युवा मंचचे अध्यक्ष साई नार्वेकर,  योगेश वेळणेकर,  आबा केसरकर,  भास्कर परब,  नंदन वेंगुर्लेकर,  आर. के. सावंत,   राजा धुरी,  शाम पावसकर,  पत्रकार शंकर कोराणे, प्रमोद म्हाडगुत, आदी उपस्थित होते.