गांधीनगर मेनरोड येथील अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई…

0
59

गांधीनगर (प्रतिनिधी) : तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक या गांधीनगर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या दुकानांचे डिजिटल फलक, कठडे, अवैध बांधकामे आज (शुक्रवार) पाडण्यात आली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली.

तर ऐन सणासुदीच्या तोंडावरच अतिक्रमणावर कारवाई का केली जाते ?  याचे गौडबंगाल समजून येत नाही. कारवाईमुळे सणाच्या गर्दीवेळी वाहतूकीची मोठी कोंडी झाली. ग्राहकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाल्याचे व्यापारी प्रतिनिधी विजय जेसवाणी यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आला. मुख्य रस्त्यावरील पानटपऱ्या, चहाची खोकी, गटारीवरील कठडे, डिजिटल फलक, लोखंडी कंपाऊंड हे सर्व जेसीबीच्या साह्याने काढले. काही जणांकडून या कारवाईला  विरोध झाला. पण ही कारवाई सुरुच ठेवली गेली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू होती, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे. प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. कविता शंकर पंजाबी, गोपाल दर्यानी, मुकेश अहुजा आणि इतर बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात मुख्य रस्त्यावर अतिक्रमीत बांधकामावर आणि न्यायालयाचा आदेश डावलणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचेही इंगवले यांनी सांगितले.

तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अवैध बांधकामे सुरू करून ती पूर्ण केली आहेत. अशा संबंधित बांधकामावर कारवाई कधी होणार, असा सवाल अंकुश वराळे आणि अशोक चंदवानी यांनी केला.

या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीकांत सुतार, संजय माळी, शिवाजी पाटील, वैभव कुंभार आदी कर्मचारी सहभागी होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.