कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाचा भंग केल्याप्रकरणी  महापालिकेच्या पथकाने आज (सोमवार) अखेर ३० हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन ५१ लाख ६६ हजार ८५ रुपयांचा दंड वसूल केला. याबद्दलची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, हॅण्डग्लोज न वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल आतापर्यंत महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ५१ लाख ६६ हजार ८५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढील काळातही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले असल्याचेही आयुक्त यांनी स्पष्ट केले.

काल (रविवार) एका दिवसात महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल ५७० जणांकडून ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला असून यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५१४ जणांकडून ५२ हजार ४०० रुपये, सामाजिक अंतर न ठेवल्याबददल १८ जणांकडून ११ हजार ५०० रुपये, मास्क व हॅण्डग्लोज न वापरल्याबददल २१ जणाकडून ४हजार २०० रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल ६ जणाकडून २ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याचेह आयुक्त बलकवडे यांनी सांगितले.