कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेचा घरफाळा सवलत योजनेतील समस्येबाबत शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. पूर्वकल्पना देऊनही उपायुक्त निखिल मोरे निवेदन स्वीकारण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

महापालिकेच्या वतीने संपूर्ण थकीत घरफाळा भरल्यास त्यांच्या दंडव्याजात जानेवारी २०२० अखेर ७० टक्के, फेब्रुवारी ६० आणि मार्च अखेर ५० टक्के सवलत योजना जाहीर केली आहे. मात्र वसुली केंद्रात सदर योजनेचा आदेश आम्हाला प्राप्त झालेला नाही,  कॉम्प्युटरला अद्याप अपडेट झालेलं नाही असे निदर्शनास आले होते. त्यामुळे या संदर्भात या योजनेतील त्रुटी दूर करून नागरिकांची गैरसोय टाळावी या मागणीसाठी आज (बुधवार) शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने उपायुक्त निखिल मोरे यांना निवेदन देण्यात येणार होते.

मात्र, उपायुक्त मोरे उपस्थित न राहिल्याने आणि त्यांनी महत्त्वाच्या कामासाठी अचानक मुंबईला जाणार असल्याचे कळविले नसल्याच्या निषेधार्थ कृती समितीच्या वतीने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेसमोर प्रशासना विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.

या वेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, अंजूम देसाई, श्रीकांत भोसले, महेश लोखंडे, रामभाऊ कोळेकर, गोरख कुंभार यांच्यासह नागरी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.