चंदगड (उत्तम पाटील) : स्वच्छ भारत अभियानातंर्गत इब्राहिमपूर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या वैयक्तिक शौचालय अनुदान वितरणामध्ये अनियमितता झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंग्लज यांच्याकडून जिल्हा परिषद कोल्हापूरला देण्यात आला. या शौचालय गैरव्यवहारातील दुबार तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वसूल करण्याचे आदेश माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चंदगडच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्र शासन आणि राज्यशासन यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानातंर्गत ग्रामीण भाग हागणदारीमुक्त व्हावा या उद्देशाने प्रत्येक शौचालयसाठी बारा हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जात होते. पण, कांही गावामध्ये तालुका पंचायतीचे समन्वयक, ग्रामसेवक, सरपंच आणि कामगार यांनी संगनमताने आपले नातेवाईक तसेच लागेबांधे असलेल्या लोकांना याचा फायदा करून दिला. काही गावात घरामध्ये जुने शौचालय असताना सुध्दा फक्त रंगरंगोटी करून नवीन बांधले असे दाखवून अनुदान लाटल्याचे प्रकार दिसून आले आहेत. चंदगड तालुक्यात अनेक गावांमध्ये असे प्रकार घडल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे चंदगड पंचायत समिती संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येते. अशा शौचालयाचे पंचायत समितीच्या सर्व्हेअरनी सर्वेक्षण कसे केले हा मोठा आश्चर्यकारक प्रश्न आहे ?

इब्राहिमपूर येथील नारायण शिरोळकर या सामाजिक कार्यकर्त्याने २०१९-२० या कालावधीत अनियमित अनुदान वाटप केल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. तसेच बोगस अनुदान वाटप करण्यात आलेल्या दोषींवर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे चंदगड पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता. पण तक्रारदार शिराळकर यांना हे मान्य नसल्यामुळे गडहिंग्लजचे गटविकास अधिकारी शरद मगर आणि विस्तार अधिकारी किरण खटावकर यांची त्रयस्थ समिती नेमून परत एकदा चौकशी केली असता इब्राहिमपूर येथील शौचालय अनुदान वाटपमध्ये अनियमतता असल्याचे दिसून आले.

त्यामुळे या शौचालय गैरव्यवहारातील दुबार तसेच अपात्र लाभार्थ्यांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदानाची रक्कम वसूल करण्याचे आदेश माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चंदगडच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.