गडहिंग्लजला वीजचोरी प्रकरणी ४६ जणांवर कारवाई

0
210

कोल्हापूर (प्रतिनिधी) : थकीत वीज बिलाच्या वसुलीसह वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महावितरणकडून वीज चोरीविरोधात धडक मोहीम सुरू आहे.

गडहिंग्लज उपविभागातील मोहिमेत मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, हिटणी या गावात ४६ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. यात ३५ हजार ६०५ वीज युनिटची आर्थिक मूल्याप्रमाणे ५ लाख ४४ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. ९५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी गावठाण वाहिनीवर वीज गळतीचे प्रमाण  अधिक आहे. महावितरणकडून निलजी वीज वाहिनीवरील मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, हिटणी या गावात राबविण्यात आलेल्या मोहिमेत २३५० वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत ४६ प्रकरणात मीटर छेडछाड, वीजवाहिनीवर आकडे, मीटर बायपास करून वीजवापर इ. प्रकारे वीजचोरी व अनाधिकृत वीजवापर आढळून आला. यावेळी घरातील मीटर दर्शनी भागात लावणे, नादुरूस्त वीज मीटर बदलणे ही कामेही करण्यात आली. कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता सागर दांगट, सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) दत्तात्रय गुरव व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.