पंढरपूर (प्रतिनिधी) : मोडलिंबकडून पंढरपूरकडे येताना काल रात्री एक फॉर्च्युनर कार ५० फूट खोल कालव्यात कोसळल्याने ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्याला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गाडी ज्या कालव्यात कोसळली होती. त्या कालव्यात उतरायला जागा नसल्याने बचाव कार्य करण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे स्थानिकांनी दोराच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील अरुंद पुलावरून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार या खोल कालव्यात पडल्याचे सांगितले जात आहे.
पंढरपूर-कुर्डुवाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आलेले असताना पाटबंधारे विभागाच्या गहाळ कारभारामुळे या पुलाबाबत अद्याप निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालल्याचा आक्षेप मनसे जिल्हा प्रमुख प्रशांत गिड्डे यांनी घेतला आहे.