पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

0
266

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरातून शिरोलीला जाणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रणजीत भुलर पाल (वय २५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी पुलावर घडला.

उत्तप्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील भारीया गावचा रणजित पाल हा कुटुंबांसह कोल्हापूरत जाधववाडी इथे भाड्याच्या घरात राहत होता. तो काल रात्री आपली मोटरसायकल क्र. एमएच ०९ बीई १३०८ वरुन कामानिमित्त शिरोलीकडे जात होता. तो पंचगंगा पुलावर आला असता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये रणजीत जोराने रस्त्यावर आपटल्यानंतर त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काहीकाळ महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीसांमध्ये झाली आहे.