मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. हा कौल ठाकरे सरकारच्या बाजूने आहे. तो मान्य करा नाहीतर राज्यातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे.  

अग्रलेखात म्हटले आहे की, ईडी, सीबीआयला हाताशी धरून राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला हवा येऊ द्या,’ अशी घणाघाती टीका भाजपवर केली आहे. ‘ठाकरे सरकार लोकांच्या मनास भिडले आहे. उद्धव ठाकरे यांचे विनम्र वागणे लोकांना भावले आहे. ग्रामपंचायत निकालांचा तोच अर्थ आहे.

विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे,  असे म्हणत  ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात २० वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत.