कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या गटात आणूरच्या अभिषेक कापडे यांने बानगेच्या उत्तम पाटील याच्यावर विजय मिळवला. तर महिला गटात शाहू साखरच्या सृष्टी भोसलेने यळगुडच्या प्रेरणा डंकेवर मात करून प्रथम क्रमांक पटकाविला.

यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, जेष्ठ संचालक आणि कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत महिला आणि पुरुष यांच्या विविध ३१ गटांमध्ये स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एकूण ५९६ मल्लांनी सहभाग घेतला होता.

तर कुस्ती हेच जीवन व महाखेल स्पोर्टस या यूट्यूब चैनलवरून कुस्ती शौकिनांना पाहण्यासाठी स्पर्धेचे थेट प्रसारण करण्यात आले होते.  भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, इटली, कुवेत, नेपाळ, कतार, जर्मनी, ग्रीस आदी सतरा देशातील सव्वा लाखांहून अधिक कुस्ती शौकिनांनी ऑनलाइन पद्धतीने ही स्पर्धा पाहिली.