• मांजरी गावाबद्दल आमच्या अंत:करणात वेगळाच आदर
  • गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार : आबा-बापूंची ग्वाही

सांगोला प्रतिनिधी :

सांगोला तालुक्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे. मागील ५० वर्षात जो विकास झाला नाही तो येत्या काळात करून दाखवायचा आहे, याकरिता ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मागील दोन अडीच वर्षाच्या काळात ७०० ते ८०० कोटी रुपयांचा निधी सांगोला तालुक्याला मिळाला आहे. येत्या काळात अजून मोठा निधी उपलब्ध करून देऊ आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करू असे सांगत, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मांजरी गावचे योगदान महत्त्वाचे आहे. कायमस्वरूपी गावाने भरभरून सहकार्य केले आहे. मांजरी गावाबद्दल आमच्या अंतकरणात वेगळाच आदर आहे. यामुळे गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही तसेच या गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे -पाटील यांनी सांगितले.

मांजरी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ तथा उदघाटन समारंभ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपक आबा साळुंखे  पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार सावंत, शिरभावी गावचे माजी सरपंच अभिजीतदादा नलवडे, शिवने ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे, धायटी ग्रामपंचायत सदस्य गणेश कदम, यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगल मधुकर भुसे, उपसरपंच श्रीम. कौशल्या वसंत कांबळे यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य- सदस्या, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे आजी-माजी पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मकर संक्राती सणांचे औचित्य साधून मांजरी ग्रामपंचायत व आबा- बापू गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निराधार महिलांना आपुलकीची साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मांजरी हे गाव  कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या खात्रीचे विश्वासाचे गाव आहे. या गावाविषयी आमच्या अंत:करणात वेगळा आदर आहे. तालुक्याचे नेतृत्व करणारे शिनगारे व तालुक्याच्या राजकीय चळवळीत अग्रेसर नाव असलेल्या जगताप यांचे गाव आहे. दलित चळवळीत काम करीत असताना ही विचार करण्यासारखे काम करणारे गाव आहे. या गावातील माणसं विचाराने भारावून गेलेली आहेत. तुमचा विचार आणि आमचा विचार याची सांगड घालून आपण गाव आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करूया, रोजगार हमीचा, पाणी नसलेला आणी दुष्काळाचा तालुका ही ओळख येत्या दोन वर्षाच्या काळात पुसून काढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देत, लोकप्रतिनिधी आणि सरपंच उपसरपंच यांच्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी गावातील ग्रामस्थांची देखील आहे.

नागरिकांनी आपल्या आडीअडीचणी सविस्तरपणे लोकप्रतिनिधी यांच्यासमोर मांडाव्यात आणि ती सोडवून घेण्यासाठी देखील पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जनतेच्या अडचणी सोडून हे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे कर्तव्य आहे. लोकांच्या मतदानाच्या स्वरूपात दिलेल्या आशीर्वादाची जाणीव ठेवून आम्ही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी काम करत आहोत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही यापुढेही कमी पडू देणार नाही. असे ही  आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे  पाटील म्हणाले, मागील दोन ते अडीच वर्षाच्या काळामध्ये सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकास करत असताना, दुष्काळी तालुक्याची ओळख होती परंतु आता टँकर मुक्त तालुका अशी ओळख निर्माण केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नव्याने योजना मंजूर केली आहे. शिरभावी योजनेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. विकासाचे नवीन पर्व सांगोला तालुक्याला या निमित्ताने सुरू झाले आहे. मांजरी ग्रामपंचायतच्या वतीने केलेल्या मागण्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दरम्यान विकासाच्या योजना राबवत असताना कामाचा दर्जा उत्तम क्वालिटीचा वापरून अधिकारी कर्मचारी यांनी स्वतः लक्ष घालून गावचा सर्वांगीण विकास करावा असेही माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार म्हणाले, सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना, तालुक्याला कधी निधी कमी पडला नाही. यामुळे मांजरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन पुढाकार घ्यावा आणि आपले गाव विकासाच्या मार्गावर घेऊन जावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेब जगताप यांनी केले दरम्यान माजी सरपंच अशोक शिनगारे यांनी मागण्या मांडल्या. तर माजी सरपंच अमृत उबाळे,सचिन शिनगारे यांनी मागण्यांचे निवेदन लोकप्रतिनिधी यांना दिले.