कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणने लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिलं वसुलीसाठी सुरू केलेली वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे अधीक्षक अभियंता मासाळ यांना देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झालेत. अनेकांचे काम बंद झाल्याने त्यांना जगणे मुश्कील झाले. त्यामुळे लॉकडाऊनमधील संपूर्ण वीज बील माफ करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. हा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित असताना महावितरणने थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावत वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरू केला आहे. ही बाब निषेधार्ह असून अशा प्रकारची कारवाई महा्वितरणने त्वरित बंद करावी अन्यथा महावितरणचे जे अधिकारी व कर्मचारी वीज तोडणी करतील त्यांच्या घरासमोर बोंबा-बोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.

या वेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, विशाल वाठारे, महेश घोलपे, दिलीप पाटील, बाबूराव बाजारी आदी उपस्थित होते.