कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात माजी खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थकांनी एकमेकांवर महापालिकेच्या नुकसानीबाबत केलेल्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. आज (मंगळवार) याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे काही दिवसांपूर्वी  माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर कोल्हापूर महानगरपालिकेचा घरफाळा थकवाल्याचा आरोप केला आहे. ड्रीम वर्ल्ड, सयाजी हॉटेल व डीवायपी सिटी मॉल या बांधकामांचे घरफाळा कुळ प्रकार न दाखवता मालकी प्रकार दाखवून घरफाळा आकारल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे १५ कोटी इतका महसूल बुडाला असल्याचे आरोपात म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री पाटील यांच्या समर्थकांनी धनंजय महाडिक यांनी आदर्श भीमा वस्त्रम या त्यांच्या दुकानाच्या पार्किंगमध्ये गाळे पाडून अवैध बांधकाम केल्याचा प्रत्यारोप केला आहे.

महापालिकेचे महसुली नुकसान थांबवण्यासाठी संबंधित बांधकामांवर योग्य घरफाळा लागू करून थकीत फाळा वसूल केला गेला पाहिजे. आरोप करणारे दोन्ही गट जबाबदार आजी-माजी लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे दोन्ही आरोपांना गंभीरपणे घेत महापालिकेने याची प्रत्यक्षात चौकशी समिती नेमून तथ्य आढल्यास त्वरित कारवाई करावी आणि घरफाळा विभागाच्या बाह्य लेखापरीक्षण करण्याचे आदेश करावेत.

यावेळी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, उत्तम पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.