कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील ओढ्यात झालेल्या अनधिकृत बांधकामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात ओढ्या शेजारील घरांमध्ये पाणी येत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र याविरुद्ध कोणतीच कार्यवाही न झाल्याने आम आदमी पक्षातर्फे आज (बुधवार) सम्राटनगर येथील ओढ्यात उतरून आंदोलन करण्यात आले.

सम्राटनगर येथील ओढ्यामध्ये एका अपार्टमेंटची सुरक्षा भिंत (रिटेनिंग वॉल) व ‘बीएसएनएल’ने केलेल्या बांधकामामुळे पावसाळ्यात रात्री-अपरात्री घरांमध्ये पाणी शिरत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. महापालिकेकडे याबाबत ‘आप’ने पाठपुरावा केल्यानंतर यावर कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मा. नितीन देसाई यांनी पाहणी करून संबंधित ओढ्याची मोजणी करण्याचे निर्देश टाऊन प्लॅनिंग विभागास दिले होते. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

याबाबत एक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ओढ्यामध्ये उतरून आंदोलन करण्यात आले. यानंतर उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. अधिकाऱ्यांनी नाल्यात उतरून अतिक्रमण झालेल्या ठिकाणची पाहणी केली व संबंधित अपार्टमेंट व शासकीय कार्यालयाला नोटीस बजावून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

ओढ्यातील अतिक्रमणे न काढल्यामुळे जर पुन्हा घरांमध्ये पाणी गेल्यास महापालिकेवर ओढ्यातील पाणी घेऊन बादली मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी ‘आप’तर्फे देण्यात आला. या वेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, युवाध्यक्ष उत्तम पाटील, मोईन मोकाशी, बसवराज हदीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, विशाल वठारे, राज कोरगावकर आदी उपस्थित होते.